चाळीसगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जोडणार्या कन्नड घाटात भीषण अपघाताची घटना घडली आहे. भडगावहून मुंबईच्या दिशेने जाणारी एक कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट दरीत कोसळली आहे. सुदैवाने, ही कार दरीत असलेल्या झाडांमध्ये अडकल्याने मोठा अनर्थ टळला असून चारही प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथून काही प्रवासी कारने मुंबईकडे निघाले होते. ही कार कन्नड घाटात आली असता, एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट सुरक्षा कठडा ओलांडून दरीत कोसळली. कार खाली जात असताना ४० फुटांवर असलेल्या झाडांच्या झुडपांमध्ये अडकली. जर कार झाडांमध्ये अडकली नसती, तर ती आणखी खोल दरीत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.
स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून मदतकार्य
अपघाताची माहिती मिळताच कन्नड घाटातील स्थानिक नागरिक, इतर वाहनचालक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. कारमध्ये दोन महिला आणि दोन पुरुष असे एकूण चार प्रवासी होते. दोरखंडाच्या साहाय्याने जखमींना दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
या भीषण अपघातात चारही जण जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नसली तरी, त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. कन्नड घाटातील अरुंद रस्ते, तीव्र उतार आणि धोकादायक वळणे नेहमीच वाहनधारकांसाठी आव्हान ठरत आहेत. अनेकदा चालकाचा अंदाज चुकल्याने अपघातांचं सत्र सुरू असतं.













